Avilability: In stock
"उताराच्या अगदी कडेला असताना गवताचा भारा बांधायला मी खाली वाकलो, तेवढ्यात वाघाने माझ्या अंगावर उडी घेतली आणि त्याच्या चार सुळ्यांपैकी एक माझ्या उजव्या डोळ्याखाली, दुसरा माझ्या हनुवटीमध्ये आणि उरलेले दोन माझ्या मानेत रुतवले. मी पाठीवर पडलो आणि वाघ माझ्या छाताडावर होता. त्याचं पोट माझ्या पायांवर होतं. पाठीवर पडताना माझे हात पसरले गेले होते. माझ्या उजव्या हाताला ओकचं एक रोपटं लागलं...तेव्हाच माझ्या मनात एक कल्पना चमकली - वरच्या बाजूला असलेलं ते ओकचं रोपटं मी हातांनी पकडलं असतं आणि मोकळे असलेले दोन्ही पाय जुळवून वाघाच्या पोटाला टेकवले असते, तर मी त्याला लांब ढकलू शकलो असतो आणि पळून जाऊ शकलो असतो. वाघाला अजिबात जाणवू न देता मी अगदी हळूहळू माझे दोन्ही पाय वर घेतले आणि त्याच्या पोटांवर टेकवले. त्यानंतर माझा डावा हात वाघाच्या छातीवर टेकवला आणि सगळ्या ताकदीनिशी त्याला विरुद्ध दिशेने ढकललं. जिम कॉर्बेट यांच्या या शिकार कथा अत्यंत चित्तवेधक आहेत. मात्र शिकार कथा म्हणजे रूढार्थाने ‘शिकारीचा आनंद देणार्या कथा’ असा यांचा बाज नाही. कॉर्बेट यांची वाघाबद्दलची आत्यंतिक आत्मीयता, अभ्यास आणि शिकार करतानाची तितकीच अगतिकताही या कथा वाचताना सतत जाणवत राहते. म्हणूनच या कथा थरारक असल्या, तरी त्यांच्यात उन्माद नाही. थरार अनुभवताना वाघाबद्दल आणि एकूणच प्राणिजीवनाबद्दल त्या वाचकाला समंजस केल्याशिवाय राहत नाहीत."