Avilability: In stock
एकोणिसाव्या शतकातील प्रबोधन पर्वात ‘स्त्री जीवन’ सांस्कृतिक जीवनात केंद्रवर्ती आले. स्त्री जीवना विषयीचे नवे भान येऊन स्त्रियांच्या प्रश्नांत नवे मार्ग काढण्याची कालसंगत प्रेरणाही निर्माण झाली. त्याचवेळी समाजजीवनाचे, माणसांच्या जीवनानुभवांचे चित्रण व्यापक पटावर करणार्या ‘कादंबरी’ या कथात्म साहित्य प्रकाराच्या लेखनाला सुरुवात झाली. साहजिकच ‘स्त्री जीवन’ कादंबरी लेखनाचा मुख्य विषय झाले. १८५७ साली प्रसिद्ध झालेली पहिली मराठी सामाजिक कादंबरी ‘यमुना पर्यटन’ तत्कालीन स्त्रीप्रश्नांचे चित्रण करणारीच होती. गेल्या १५० वर्षात ‘स्त्री’ हा समाजातील महत्त्वाचा परिवर्तनशील घटक आहे. या दीर्घकाळात स्त्री जीवन बदलत आले. स्त्रियांच्या प्रश्नांचे स्वरूप पालटत आले. बदलत्या स्त्री प्रश्नांचे ‘साद-पडसाद’ सामाजिक कादंबरीतून उमटले. स्त्री प्रश्नांची मांडणी करणार्या कादंबर्यांचा एक स्वतंत्र प्रवाहच विकसित झाला. विधवा विवाह, विषम विवाह, परित्यक्तेचे जीवन, घटस्फोट, पतिपत्नींचे बदलते नाते, १९७५ नंतर स्त्रीचे जागृत होणारे आत्मभान आणि स्त्रीची विकसित स्वयंनिर्णय क्षमता, इत्यादी प्रश्नांचे ‘साद-पडसाद’ कादंबर्यांतून चित्रित झाले. ‘यमुना पर्यटन’ (१८५७) ते ‘ब्र’ (२००५) या काळातील महत्त्वाच्या निवडक कादंबर्यांतील ‘साद-पडसादांचा’ आस्वादक व चिकित्सक वेध डॉ. स्वाती कर्वे यांनी घेतला आहे. स्त्री प्रश्नांबरोबर विकसनशील स्त्री जीवनाचा, बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचा आलेखही प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी यामधून साकार केला आहे. - रेखा साने-इनामदार