Avilability: In stock
साधारणपणे दीड-दोन लाख वर्षांपूर्वी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीच्या दुर्दम्य ईर्ष्येपायी मानवी प्राण्याने पहिल्यांदा स्थलांतराची वाट धरली. कालांतराने या मानवाने टोकाच्या विपरित परिस्थितीवर मात करत अवघी पृथ्वी व्यापली. तो स्थलांतराचा सनातन प्रवाह सुरू आहे, तो आजतागायत! या प्रक्रियेतून जसा मानवी व्यथा-वेदनांचा पट विस्तारत गेला, तसाच मानवी संस्कृती-परंपरांचा, कल्पना-संकल्पनांचाही मनोहरी मेळ घडून आला. यातूनच प्रगतीच्या नवनव्या वाटा खुल्या झाल्या. मानवी प्रज्ञेचा अकल्पित विकासही घडून आला. म्हणजेच स्थलांतराने एकाच वेळी प्रगतीबरोबरच वेदनेचेही दान माणसाच्या पदरात टाकले. परंतु ज्या टप्प्यावर हा प्रवाह खंडित झाला, तिथे अधोगतीच्या थांब्याचीही नोंद इतिहासाने घेतली. आज जग एकविसाव्या शतकातल्या तिसर्या दशकात प्रवेश करत आहे. या टप्प्यावर देशोदेशी उफाळून येणार्या कडव्या राष्ट्रवादाचे, संकुचित व्यापार-उदीम धोरणांचे, परधर्मद्वेषाचे, पर्यावरण बदलाचे, कोरोनासारख्या वैश्विक महासाथीचे, टोळीयुद्ध-दहशतवाद-लष्करी आक्रमणांच्या धोक्याचे मोठे आव्हान स्थलांतराच्या प्रक्रियेपुढे उभे आहे. या साऱ्याउलथापालथीचा साकल्याने मानवकेंद्री वेध घेणारा दस्तऐवज म्हणजे हे पुस्तक होय.