Avilability: In stock
कोल्हापूरच्या बसस्टॅँडवर पोटासाठी पेपर विकण्यापासून सुरू झालेला हा प्रवास राज्यातील आघाडीच्या ‘सकाळ’ माध्यमसमूहाचा समूहसंपादक म्हणून निवृत्त होईपर्यंत चालला. तब्बल चार दशकांच्या या अविरत प्रवासाने गटांगळ्या खात पोहायला शिकणार्याला पट्टीचा जलतरणपटू बनवले,’’ असा आत्मसमाधान, आत्मधन्यता देणारा कृतार्थ प्रवास म्हणजे हे पुस्तक होय. अर्थात कसलीच शाश्वती नसलेल्या परिस्थितीतून करावा लागणारा असा प्रवास वाट्याला येणं ही सामान्य गोष्ट नाही. कारण दबलेल्या समाजातून, अत्यंत आर्थिक हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येण्यासाठी, अनेक अडचणी आणि अडथळे पार करत दमछाक करणारी शर्यत जिंकण्यासाठी कराव्या लागणार्या संघर्षाची ती गोष्ट आहे. आणि या गोष्टीतले नायक आहेत, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे! अवघड, अथक संघर्षशील अशा पत्रकारितेतल्या चाळीस वर्षांच्या वाटचालीचा मागोवा त्यांनी त्यांच्या दृष्टीतून या पुस्तकात घेतला आहे. एका अर्थी पत्रकार म्हणून जगलेल्या आयुष्याचं हे आत्मकथन आहे. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर स्वतःची मनःस्थिती आणि भोवतालची स्थिती काय होती, त्यातून आपण कोणत्या भूमिकेतून कोणती पावले उचलली आणि त्याचे एकूण परिणाम काय झाले याची विस्ताराने मांडणी करणारा हा ग्रंथ. त्यात त्यांनी बातमीदारीपासून संपादकपदापर्यंत कोणते प्रयोग केले याचं प्रामुख्यानं विवेचन केलं आहे. पत्रकारितेत येऊ इच्छिणार्या, सध्या कार्यरत असलेल्या व काही वेगळं, सकारात्मक काम करू इच्छिणार्या प्रत्येकासाठी हे विवेचन नवी दृष्टी व दिशा देणारं आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी तिला शरण न जाता, जिद्द आणि अभ्यासाने कमावलेला आत्मविश्वास कायम ठेवला पाहिजे. कामात वैविध्य आणि गुणवत्ता यात सातत्याने वृद्धी करत लढत राहिले पाहिजे. अनुभव कटू असले तरी आयुष्याबद्दल आणि माणूस नावाच्या जिवाबद्दल कटुता न जोपासता सद्भाव जपला पाहिजे. त्याचबरोबर यशाची शिखरे गाठताना आणि गाठल्यानंतरही जमिनीवरचे पाय सुटू देता कामा नये, अशी अनेक जीवनसूत्रे हे पुस्तक आपल्याला देतं.