Avilability: In stock
"‘पाश्चिमात्य राजकीय विचारवंत’ हा विषय विविध विद्यापीठांमध्ये शिकविला जातो. नेट/सेट, संघ आणि लोकसेवा आयोग अशा विविध परीक्षांच्या अभ्यासक्रमांत या विषयाचा समावेश आहे. प्रस्तुत पुस्तकाची रचना करताना ह्या सर्व गोष्टींचा विचार करून लेखन केलेले आहे. पाश्चिमात्य देशांना राजकीय विचारवंतांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. जगातील बहुसंख्य राजकीय विचारधारांचा जन्म पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांच्या विचारातून झालेला दिसतो. पाश्चिमात्य राजकीय विचार परंपरेतील प्रमुख चौदा विचारवंतांच्या विचारांचा या पुस्तकाद्वारे सविस्तर आढावा घेतलेला आहे. पहिल्या दोन प्रकरणांत पाश्चिमात्य राजकीय विचारांची पायाभरणी करणार्या ‘प्लेटो’ आणि ‘ऍरिस्टॉटल’ या प्रमुख दोन विचारवंतांच्या विचारांचा समावेश केलेला आहे. त्यानंतर आधुनिक राज्यशास्त्राचा जनक निकोलो मॅकियाव्हेली आणि करारवादी विचारवंत थॉमस हॉब्ज, जॉन लॉक, रूसो या विचारवंतांच्या विचारांची माहिती दिलेली आहे. उदारमतवादी विचारवंत जॉन स्टुअर्ट मिल, राजकीय विचारांच्या क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तनाबद्दल सिद्धान्त मांडणारे कार्ल मार्क्स आणि थॉमस हिल ग्रीन यांच्याही विचारांचा या पुस्तकातून परामर्श घेतलेला आहे. प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून पाश्चिमात्य विचार प्रवाहातील बहुआयामी आणि बहुविध विचारप्रवाहांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गास पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांचे विचार समजण्यास मदत होईल. तसेच अभ्यासू प्राध्यापक वर्गाला अध्यापन करताना संदर्भ ग्रंथ म्हणूनही हे पुस्तक उपयुक्त ठरेल."