Avilability: Out of stock
कोरोनासंसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे आपण अभूतपूर्व असा काळ अनुभवला. जग थांबण्याचा असा अनुभव यापूर्वी आपल्यापैकी कुणीही घेतलेला नव्हता. आपल्या देशाचीच नव्हे, तर सार्या जगाची घडी त्यामुळे विस्कटून गेली. लाखो लोक कोरोनाच्या कचाट्यात सापडले, हजारो लोक मृत्युमुखी पडले. करोडो लोक लॉकडाऊनमुळे भरडून निघाले, तर कित्येक जण नाना कारणांमुळे मानसिक संतुलन हरवून बसले. हा काळ आपल्या सर्वांचीच परीक्षा बघणारा होता. अशा संकटाला आपण समाज म्हणून, सरकार म्हणून किंवा व्यक्ती म्हणून कसे सामोरे जातो; कुठे पुरे पडतो, कुठे अपुरे पडतो, कुठे सपशेल अपयशी ठरतो हे पाहणं आवश्यक असतं. हे काम करण्यासाठी लिहिलेल्या या नोंदी! कोरोनाकाळात देश-विदेशातल्या विविध माध्यमांमध्ये या संकटाच्या अनुषंगाने प्रचंड लिहिलं-बोललं जात होतं. त्यातले महत्त्वाचे लेख, सरकारी माहिती, विविध तज्ज्ञांचं म्हणणं खंगाळून आणि आसपास घडणार्या घडामोडी टिपत पत्रकारी नजरेतून लिहिलेल्या या नोंदी आहेत. आपल्यासमोर आरसा धरणार्या. आपल्या समाजाचा आडवा छेद दाखवणार्या. …………… या लॉकडाऊन नोंदींमधून ‘मध्यमवर्गीय’ आणि ‘माध्यमवर्गीय’ संवेदना ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. या नोंदींचा अर्थ शोधायचा ठरवलं आणि ही संवेदना आपणही ओलांडली तर- मार्च २०२० पासून पुढचे चारेक महिने भारतात सार्वजनिक विश्वात जे घडलं त्याचा अर्थ लावण्यासाठी सदर नोंदवही उपयोगी पडू शकते. चिकित्सेच्या नजरेने पाहिलं तर दमनकारी राज्याची दमदार पावलं, संशयी समाजाच्या निर्मितीला हातभार आणि गरिबांच्या हद्दपारीवर झालेलं शिक्कामोर्तब हे तीन धडे या लॉकडाऊनने आपल्याला दिलेले दिसतात. – सुहास पळशीकर (प्रस्तावनेतून)