Avilability: In stock
रॉबिनहूडचा स्त्री अवतार म्हणजे फूलनदेवी. उत्तर प्रदेशात जन्मलेल्या डाकूराणी फूलनदेवीचं हे खरंखुर आत्मकथन आहे. खालच्या जातीच्या गरीब घरात जन्मलेल्या फूलनने दारिद्र्य आणि अपमानाचं जीणं यांचा सामना केला. अशा समाजात ती टिकून राहिली की जिथे पोटात आणि भिंतींमध्ये माती लिंपावी लागते, अशा समाजात की जिथे भटक्या म्हशीला एखाद्या मुलीपेक्षा जास्त मान दिला जातो. आपल्यापेक्षा तिप्पट वयाच्या विधुराशी लग्न लागल्यावर अवघ्या अकराव्या वर्षी तिला मारहाण, अपमान आणि अत्याचारांना सामोरं जावं लागलं. समाजानं तिची वेश्या म्हणून संभावना केली. तिला ठार करण्यासाठी सुपारी घेतलेल्या डाकूंनी तिला पळवलं. पण ती त्यातूनही जगली आणि स्वतः डाकू बनली. पुरुषांसारखी बंदूक चालवून ती दरोडे घालू लागली. तरीही ती एक स्त्री होती. तिला प्रेमाची भूक होती. तिला प्रेम आणि आधार देणारा माणूस नियतीने तिच्यापासून हिरावून घेतला. त्यानंतर अनेक डाकूंनी अत्याचार केले. अपमान आणि अत्याचारांनी कल्पनेच्या बाहेर घायाळ होऊनही ती जिवंत राहिली. तीन वर्ष ती उत्तरप्रदेशातल्या जंगलांमध्ये डाकू म्हणून थैमान घालत होती. अत्याचाराची शिकार होणार्यांच्या अन्यायाला वाचा फोडणे आणि अत्याचार्यांना शासन करणे, श्रीमंतांना लुटून ती संपत्ती गोरगरिबांना वाटणे त्यामुळे ती लोकप्रिय झाली. सरकार हवालदील झालं. अखेर ती शरण आली आणि मग अकरा वर्ष खटल्याशिवाय तुरुंगात तिला स्थानबद्ध करून ठेवण्यात आलं. अजूनही तळागाळातल्या शोषित वर्गाला ती आपली वाटते. फूलन म्हणते, ’’मी स्वतः फार चांगली आहे असं माझं म्हणणं नाही. पण मी वाईटसुद्धा नाही. पुरुषांनी मला जे भोगायला लावलं त्यांना मी त्याचीच परतफेड करायला लावली. माझ्या जातीतली एक स्त्री प्रथमच आपली कहाणी सांगतेय. अन्यायानं दबल्या जाणार्या आणि अपमानानं जळणार्या लोकांसाठी मी धैर्यानं हात पुढे करत आहे. मी जे भोगलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हा प्रयत्न.’’