Avilability: In stock
अठराव्या शतकातील हिंदुस्थानातील प्रेम आणि प्रतारणेची कहाणी. ’व्हाइट मुघल्स’ हे सुधा नरवणे यांचे पुस्तक मूळ लेखक विल्यम डॅलरिंपल यांच्या याच नावाच्या इंठाजी कादंबरीवर आधारित आहे. खैरुन्निसा, एक असामान्य रूपवान महिला, जेम्स कर्कपॅट्रिकची लाडकी प्रियतमा आणि हेन्री रसेलने त्याग केलेली प्रेयसी, अशा खैरुन्निसाचा हा जीवनप्रवास आहे. तिचं आयुष्य म्हणजे पराकोटीची दुःखगाथाच होती. अत्यंत कोवळ्या, निरागस वयात तिने सर्वांचा विरोध पत्करून आपल्याला आवडलेल्या तरुणाशी लग्न केलं; पण अकाली वैधव्य तिच्या वाट्याला आलं. बदनामीला तोंड द्यावं लागलं, हद्दपार व्हावं लागलं आणि अखेर परित्यक्तेचं जीवन कंठावं लागलं. इंठाज सरकारने ते हिंदुस्थानात राज्य करत असताना हैदराबादमध्ये रेसिडेन्ट म्हणून जेम्स कर्कपॅट्रिक याची नेमणूक केली होती. तो एक कर्तव्यदक्ष, निःपक्षपाती न्यायबुद्धी असलेला आणि सत्यप्रिय अधिकारी होता. हिंदुस्थानातील मुस्लीम सौंदर्यवती बेगम खैरुन्निसा अशा रुबाबदार व गोर्या तरुण अधिकार्याच्या प्रेमात पडली. जेम्सलाही मनापासून खैरुन्निसा आवडली होती. तो काळ असा होता की, जेव्हा स्त्रियांपुढे फारच थोडे पर्याय होते; आवडीनिवडीला विशेष वाव नव्हता. स्वतःच्या आयुष्यावरही त्यांचा हक्क नव्हता, अशा काळात खैरुन्निसाने रूढीरिवाजाविरुद्ध बंड केले आणि जेम्सशी लग्न करण्यासाठी आत्महत्येची धमकी दिली, आपले सर्वस्व पणाला लावले. जेम्स हा वेगळ्या संस्कृतीत वाढलेला, दुसर्या वंशाचा आणि प्रारंभी दुसर्या धर्माचा होता. त्यानेही खैरुन्निसाशी लग्न करण्यासाठी मुस्लीम धर्म स्वीकारला. आपलं स्वप्न साकार झाल्याच्या आनंदात ती मश्गुल असताना तिची मुलं साहिब अलम ऊर्फ विल्यम जॉर्ज कर्कपॅट्रिक व साहिब बेगम ऊर्फ कॅथरिन ऑरोरा शिक्षणासाठी जेम्सच्या मायदेशात गेली. त्यानंतर जेम्सचं अवघ्या 41व्या वर्षी निधन झालं. त्या वेळी खैरुन्निसा केवळ 19 वर्षांची होती. तिच्या प्रेमप्रकरणामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये दुही निर्माण झाली आणि ती, तिची आई आणि आजी तिघींचाही सर्वनाश व्हायची वेळ आली. अशा वेळी सहानुभूती दाखवून, अनेक प्रसंगी मदत करणारा हेन्री रसेल हा एक अधिकारी तिच्या आयुष्यात आला. मात्र, रसेल जेम्सपेक्षा खूपच वेगळ्या स्वभावाचा होता. तो अतिशय अहंकेंद्री, घमेंडखोर आणि संवेदनशीलतेचा अभाव असलेला असा होता. एकदा खैरुन्निसाला आपलंसं केल्यावर त्याने तिला नंतर दिलेल्या वागणुकीवरून त्याच्या स्वभाववैशिष्ट्यांचं दर्शन घडतं. जेम्स मरण पावल्यावर खैरुन्निसा खूपच एकाकी झाली होती. पुढे आठ वर्षांनी ती मृत्यू पावली. शारीरिक विकाराने तिचा मृत्यू झाला असला तरी हृदयभंग, उपेक्षा आणि दुःख यामुळेही तिची जीवनेच्छा संपुष्टात आली असावी.