Avilability: In stock
‘मी गोष्टीत मावत नाही’ ही डॉ. सुधीर रा. देवरे यांची कादंबरी वाचल्यानंतर कादंबरी लेखनाचा केंद्रबिंदू जो पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर या सांस्कृतिक व्यवहाराच्या झपाट्यात सापडला आहे, असं वाटत होतं; पण तो येथे सुटल्यासारखा वाटतो. याची कारणमीमांसा प्रदीर्घ अंगाने कादंबरी वाचताना सापडते. गोष्टीत न मावणे अशा पद्धतीचा एक धाक ही कादंबरी प्रस्तुत करते. कादंबरीतील आशय, निवेदनशैली, भूप्रदेशाच्या अंतरंगात रुजलेला सहवास, जिज्ञासेतील सातत्य असं अभूतपूर्व मिश्रण या कादंबरीत सापडते. साठोत्तरी कादंबरी ही तत्कालीन लेखकाच्या प्रभावाखाली प्रयोगात्मक मूल्यांकडे अधिक बंदिस्त होत चालली होती. प्रस्तुत कादंबरी या बंदिस्तपणातून सुटण्याचे प्रयोजनमूल्य सिद्ध करते आणि नव्या काळाचे अपेक्षित भान उजागर करते. आत्मकथनाच्या अधिक वर जात असताना, कादंबरी या वाङ्मयप्रकाराचे अवकाश अधिक विस्तृत करत ‘मी’ला सोडून द्यावे लागते. लेखकाला ते साध्य झाले आहे. कथनशैलीला समांतर जात असताना, अपेक्षित गोष्टी सामुदायिक अंगाने बघून कादंबरी उभी केल्यास तिचे महत्त्व व्यापक बनते, हे सिद्ध करायला ही कादंबरी पुरेशी ठरेल, असे मनापासून वाटते. - जी. के. ऐनापुरे