Avilability: In stock
स्वातंत्र्योत्तर सुरुवातीच्या काळात भारतीय क्रिकेट हा खेळ तत्कालीन संस्थानिक, अभिजन, श्रीमंत अशा विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असायचा. ‘शाही रंजन’ असेच क्रिकेटचे स्वरूप होते. संस्थाने खालसा झाल्यानंतर कालौघात बदलत्या राजकीय परिस्थितीशी समांतर क्रिकेटची व्याप्ती इतरेजनात वाढत गेली. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक स्थित्यंतर होत असताना भारतीय क्रिकेटमध्ये विकासात्मक परिवर्तन होत गेले. त्या काळापासून ते आजच्या ‘नं-१ पोझिशन’पर्यंत यायला काही दशकांचा कालावधी उलटावा लागला. याच काही दशकांच्या कालावधीत अनेक गुणी खेळाडूंनी क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव कोरले. ‘प्रिंट व इलेक्टॉनिक मीडिया’चे नामवंत पत्रकार आणि माजी कसोटीपटू दिलीप सरदेसाई यांचे चिरंजीव राजदीप सरदेसाई यांनी आजवरच्या क्रिकेटपटूंमधील आदर्श ११ जणांची निवड केली (खरेतर बहुतांश वाचकांच्या मनातले हेच आदर्श क्रिकेटर आहेत) आणि प्रत्येक खेळाडूची कारकीर्द वाचकांपुढे मांडली आहे. या ११ कीर्तिमान खेळाडूंची चरित्रकहाणी राजदीप यांनी शब्दबद्ध केली आहे. प्रस्तुत पुस्तकात त्यांची कारकीर्द आकडेवारीसह येतेच, पण त्यांचे मैदानावरील आणि मैदानाबाहेरील आयुष्याचे उद्धृत केलेले संदर्भ संक्षिप्त तरीही परिपूर्ण वाटतात. त्या त्या खेळाडूच्या खेळातील व खेळाबाहेरील गुणदोषांचे सटीक आणि सटीप विश्लेषण राजदीप करतात. या खेळाडूंच्या आयुष्यातील क्रिकेटचा ‘उपोद्घात’ (अर्थात प्रारंभ) आणि ‘सिंहावलोकन’ (अर्थात निवृत्ती) असा सर्वसमावेशक तपशील वाचकांना अवगत होतो. राजदीप स्वत: क्रिकेट खेळले आहेत. आनुवंशिक वारसा म्हणून क्रिकेट त्यांच्या रक्तातच आहे. म्हणूनच त्यांचे क्रिकेटविषयीचे विश्लेषण अनुभवाच्या मुशीतून आलेले आहे. एखाद्या खेळाडूविषयी लिहिताना क्रिकेटमधले धुरीण, बुजुर्ग आणि समकालीन क्रिकेटपटूच्या मतमतांतराची पुस्तकात असलेली पखरण हा तर खास ‘राजदीप टच’ म्हणावा लागेल. एखाद्या खेळाडूचे फक्त गुणवर्णन, त्याचे विक्रम आणि आकडेवारी, त्याची विश्वस्तरीय कामगिरी, त्याची शैली, त्याचे कौशल्य, देशातील आणि जगभरातील लोकप्रियता याचेच वर्णन पुस्तकात येते असे नाही. तर त्या खेळाडूचे दोष, त्याच्या चुका, त्याच्या वर्तनातील विसंगती, त्याचे फसलेले निर्णय, त्याच्याविषयीचे प्रवाद आणि समज, त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ‘दुसरी’ बाजू असे समग्र चित्र उभे करताना राजदीप शब्दांची कंजुषी करत नाहीत. उलट त्यांच्या लिखाणाला परखडतेची धार येते. राजदीप यांची भाषा प्रवाही आहे. त्यात लालित्य आहे आणि सौंदर्यही... विषयाच्या ओघात आलेली त्यांची काही पल्लेदार वाक्ये पाहू : त्या सभ्य काळाचं दिलीप सरदेसाई हे ‘पॉडक्ट’ होतं... भविष्याच्या पोटात उमेदीचा गर्भ श्वास घेऊ लागला... त्याच्या बॅटमधून धावांचे झरे फुटत होते... आक्रमण हाच बचावाचा उत्तम मार्ग असतो... रिचर्ड्सच्या उंच उडालेल्या चेंडूवर कपिलची नजर रुतलेली होती... ज्या वयात गणित शाळकरी मुलांना घाम फोडतं, त्या वयात हा मुलगा नवीन समीकरणं जुळवत होता... ‘तो’ षटकार म्हणजे आपल्या आगमनाचा तेंडुलकरी ऐलानच होता... याच काळात क्रिकेटचं कॉमर्सशी लग्न झालं... विकासाच्या वाटेत इंडिया पुढे निघून गेला; भारत मात्र मागेच राहिला... पुस्तकात ठायी ठायी असलेली अशी वाक्यं राजदीपच्या प्रतिभेची, लेखनकौशल्याची आणि कल्पनाविलासाची प्रचिती देतात. चिवडा खाताना घासात काजूचा तुकडा यावा, अशीच ही खुमासदार वाक्यं आहेत. मेघना ढोके यांचं अनुवाद कौशल्य लाजबाब आहे. अस्सल मराठीकरणाचा हा उत्तम नमुनाच आहे. राजदीपच्या लेखनाची खुमारी मेघनाने दुणावली आहे. आजच्या काळात क्रिकेट न आवडणारा विरळाच. पण असलाच, तर त्याने हे पुस्तक आवर्जून वाचावे. कदाचित त्याला क्रिकेट श्वासाइतकेच महत्त्वाचे वाटू लागेल...