Avilability: In stock
शहाशुजा उल्-मुल्कला तरुण वयातच आजोबा अहमदशहा अब्दाली यांनी स्थापन केलेलं दुर्राणी साम्राज्य वारसाहक्कानं मिळालं. जगातला सर्वांत मोठा हिरा कोह-इ-नूर - कोहिनूर, (प्रकाशाचा पर्वत) आणि ‘फखाज’ (पुष्कराज!) नावाचं माणिक ही या घराण्यातली दोन अत्यंत मौल्यवान नाहीशी झालेली रत्नं शहाशुजाने विश्वासातल्या माणसांकरवी परत मिळवली. शहाशुजा हा उच्चविद्या विभूषित, हुशार, निश्चयी आणि अविचल वृत्तीचा आणि मित्रांशी असाधारण निष्ठेनं वागणारा होता. संपूर्ण आयुष्यात त्याला वारंवार गंभीर आपत्तींना सामोरं जावं लागलं; परंतु तो कधीही खचला नाही किंवा निराशही झाला नाही. त्याच्या संपूर्ण आयुष्यात आशावाद हेच त्याचं बलस्थान ठरलं. शुजाच्या अंगी अनेक दोष होते आणि त्यानं अनेकदा चुकीचे निर्णय घेतले; परंतु जेव्हा नोव्हेंबर १८४१ मध्ये बंड उसळून दाराशी संकट येऊन उभं राहिलं, तेव्हा कार्यक्षमतेनं त्याचा लष्करी प्रतिकार करणारा संपूर्ण काबूलमधला एकमेव माणूस फक्त शहाशुजा होता. ‘अकार्यक्षम ब्रिटिश आश्रयदात्यांच्या सेनेवर अवाजवी भिस्त टाकणं, ही त्याची सर्वांत मोठी चूक ठरली.’ शुजाचं खूपसं आयुष्य जसं अपयशाच्या छायेत व्यतीत झालं; त्याच पद्धतीनं त्याच्या वादळी आयुष्याची अखेर झाली.