Avilability: In stock
गावाच्या वेशीपर्यंत जाऊन सदाशिव परत फिरला. संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. पश्चिमेला सूर्य झपाट्याने क्षितिजाजवळ सरकत होता. पावसाची भुरभुर अजूनही चालूच होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहात तो गावाच्या दिशेनं गाडी हाकीत होता आणि अचानक त्याला रस्त्याच्या डाव्या बाजूला थोडं दूर एक छोटेखानी बंगला दिसला. गंमत म्हणजे त्या बंगल्याच्या आजूबाजूला, दोन-अडीचशे मीटरच्या अंतरात एकही घर, दुकान किंवा साधी टपरी ही नव्हती. ओसाड सड्यावरचा तो एकाकी बंगला बघून सदाशिवनं नकळत गाडी थांबवली. यापूर्वी तो बंगला तिथं पाहिल्याचं त्याला अजिबात आठवत नव्हतं. गाडीतून उतरून अनाहूतपणे तो त्या बंगल्याच्या दिशेनं निघाला. संध्याकाळच्या संधिप्रकाशात तो बंगला तसा अगदी स्पष्ट दिसत होता. बंगल्याच्या चारही बाजूला दगडाचं दोन-तीन फूट उंचीचं, जागोजागी भगदाड पडलेलं कुंपण होतं. बंगल्याच्या समोरचा कुंपणाचा भाग तोडून आत जायची जागा तयार केलेली होती. कुंपणाच्या आत येऊन पायाखालच्या पाल्यापाचोळ्यातून सावधपणे चालत तो बंगल्यासमोर पोहोचला. बंगल्याच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर ‘गंगाधर स्मृती’ अशी सुंदर कोरलेली अक्षरं होती. मुख्य दरवाजा बंद होता अन् त्याचं कुलूप तुटून लोंबकळत होतं. ठिकठिकाणी भली मोठी कोळीष्टकं लोंबत होती. आत कुणी असेल असं वाटत नव्हतं. काळोख दाटत होता. सदाशिवनं दार आत ढकललं. घर बरेच दिवस बंद असल्याच्या सगळ्या खुणा आत सगळीकडे पसरल्या होत्या. जिथं तिथं लोंबणारी कोळिष्टकं, जळमटं, पोपडे उडालेला भिंतींचा रंग आणि छतावरून पाणी ओघळून ओल्या झालेल्या भिंती आणि पायाखालची तुटलेली फरशी ! कोपर्यातल्या बंद खिडकीजवळ एक धूसर मनुष्याकृती असल्याचा भास होत होता. ‘या... ’ खिडकीजवळ सदाशिवला कुणीतरी बेालावून सांगत होतं. ‘मी, गंगाधर !’