Avilability: Out of stock
एकोणिसाव्या शतकात, महाराष्ट्रात जातीभेद, स्पृश्य-अस्पृश्य वाद, अंधश्रद्धा, ब्राह्मणांचे सर्व क्षेत्रातील वर्चस्व, समता, बंधुता, स्वातंत्र्य, मानवी हक्क या मूलभूत तत्त्वांचा आणि प्रामुख्याने खुल्या शिक्षणाचा अभाव या सार्या अवगुणांमुळे मराठी समाज मरगळल्यासारखा झाला होता. ही दयनीय परिस्थिती बदलण्यासाठी आमूलाग्र सामाजिक क्रांती झाली पाहिजे, अशी जोतीराव फुल्यांची खात्री झाली होती; आणि हे साध्य करण्यासाठी सार्वत्रिक शिक्षण हेच एकमेव शस्त्र आहे या तत्त्वाचा स्वीकार करून शिक्षणाच्या प्रसाराच्या कार्याला त्यांनी सर्वस्वी वाहून घेतले. जोतीरावांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई आणि मित्रमंडळी यांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणांत मागासलेल्या वर्गासाठी शाळा काढल्या आणि जनजागृतीच्या कार्याचा पाया रचला. मुलींची शाळा सर्वप्रथम जोतीरावांनीच सुरू केली. ब्रह्मवृंदांचा विरोध सहन करून स्त्रियांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. जे आजवर कोणी केले नव्हते ते प्रत्यक्ष समाज सुधारणेचे काम जोतीरावांनी सुरू केले. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकर्यांचा असूड, अखडांदि काव्यरचना, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक इत्यादी साहित्य निर्मिती करून समाजातील शोषणाच्या प्रवृत्तीवर घणाघाती टीका केली. या कार्यामुळे महाराष्ट्रातील ‘सामाजिक क्रांतीचे अग्रणी’ म्हणून जनमानसांत त्यांची प्रतिमा निर्माण झाली आणि जनतेने सन्मानाने त्यांना ‘महात्मा’ बनविले. ‘‘सत्याचा पालनवाला ॥हा धन्य जोतिबा झाला पतितांचा पालनवाला ॥हा धन्य महात्मा झाला ’’ अशी त्यांची गुणवंदना शिक्षण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली आहे. जोतीराव फुले यांचे कार्य आणि विचार आजही आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहे.