Avilability: In stock
महेंद्र मुंजाळ, शर्मिष्ठा भोसले आणि प्रतिक पुरी यांच्या संपादनाखाली प्रसिद्ध झालेला ‘अक्षरलिपी’चा हा दुसरा दिवाळी अंक आहे. रिपोर्ताज हे वर्तमान परिस्थितीचं आढावा घेणारं एक सशक्त माध्यम असतं. त्यामुळेच ‘अक्षरलिपी’मध्ये रिपोर्ताजवर जास्त भर असतो. देशाच्या विविध भागांमध्ये स्वतः जाऊन लेखकांनी हे रिपोर्ताज लिहिले आहेत. त्यामुळे त्याला वर्तमान सत्याचं प्रामाणिक अधिष्ठान लाभलेलं आहे. सदर अंकात मनोहर सोनावणे, शर्मिष्ठा भोसले, अभिषेक भोसले, मुक्ता चैतन्य, आदर्श पाटील, मिनाज लाटकर, प्रभा कुकडे, पराग पोतदार, कल्पना दुधाळ, दत्ता कानवटे, हिना खान इत्यांदींचे रिपोर्ताज व लेख आहेत. साहित्यिक, वैचारिक आणि सामाजिक जाणीवांचा आढावा घेणारे साहित्य ही देखील या अंकाची खासियत असणार आहे. जेष्ठ्य साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या आगामी कादंबरीतला एक अंश हे या अंकाचं वैशिष्ट्य ठरावं. तर आजचा आघाडीचा नवोदित कथाकार प्रणव सखदेव याची कथा सामाजिक शोषणावर नव्यानं विचार करायला लावते. ह्रषिकेश गुप्ते यानं मानवी लैंगिक भावनांचा आढावा घेणारा अभ्यासू लेख लिहिला आहे. कवितांमध्ये अनुवादीत कवितांचा एक वेगळा विभाग केला आहे ज्यांतून विविध भाषिक कवींच्या काव्यजाणीवांचं दर्शन वाचकांना घडणार आहे.