Avilability: In stock
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य हा एक प्रेरणा देणारा जीवनदायी किरणांचा अखंड स्त्रोत आहे. या प्रेरणास्त्रोतातून मिळणारी प्रेरणा जीवनाच्या प्रत्येक अंगास स्पर्श करून उल्हासित आणि उत्साहीत करते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये निराशेचे क्षण येतात, अशावेळी निराश न होता कार्यरत राहण्याचा दिलासा बाबासाहेबांच्या जीवनातून मिळतो. बाबासाहेबांची बुद्धिमत्ता ही स्तिमित करणारी आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे हस्तीदंती मनोर्यातील नसून सर्वसामान्यांच्या उद्धाराचा ध्यास घेणारे आहेत. प्रज्ञा, शील आणि करुणा या त्रिसूत्रींचा जसा ते पुरस्कार करतात, तसेच समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या विचारांची सबळ पाठराखण ते करतात. भारत हे राष्ट्र म्हणून उदयास यावे, आणि ते चिरकाल टिकावे, यासाठी त्यांनी केलेली संविधान निर्मिती ही एक एकमेवद्वितीय अशीच आहे. शिक्षणविषयक त्यांचे विचार हे मूलगामी, परखड आणि दिशादर्शक असेच आहेत. सर्वसामान्यांचा आणि वंचित घटकांचा उद्धार हे त्यांचे ध्येय होते. वंचित घटकांचा उद्धार हे त्यातील एक प्रयोग होता. अर्थकारण, समाजकारण, राजकारण, धर्मकारण, शिक्षण, स्वातंत्र्य आणि इतर विषयात त्यांनी केलेले अध्ययन, मनन आणि चिंतन यातून हा बोध होतो. या सर्वदर्शी पैलूंचा वेध घेण्याचा प्रयत्न या ग्रंथात केला आहे. डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. जनार्दन वाघमारे, श्री. ज. वि. पवार यासारख्या लेखकांनी दिलेल्या योगदानाने हा ग्रंथ समृद्ध झाला आहे. समाजकारण, राजकारण, लोकशाही, शिक्षण, अर्थकारण, धर्मकारण आणि संविधान अशा विविध विषयांवरील आशयपूर्ण लेख या ग्रंथामध्ये आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांना ग्रंथ रूपाने दिलेली ही आदरांजली.