Avilability: In stock
एखाद दुसर्या दिवसाच्या वास्तव्याकरता जमवून ठेवलेल्या वस्तू आणि बंद ठेवण्यासाठीच बांधलेलं ते घर बघून माझ्या मनात निष्कारण कालवाकालव झाली ! मागच्या पडवीचं दार बंद होतं. ते उघडलं की निश्चितच मागच्या परसात विहीर असेल. कदाचित अळूची नाहीतर केळीची झाडं असतील . कदाचित नसतीलही ! बहुदा नसतीलच . सकाळी दरवाजा उघडला असता तरी चाललं असतं. पण मी अनाहूतपणे दारापर्यंत चालत गेलो . दाराचा कोयंडा काढला आणि बाहेरच्या भणभणत्या वार्यानं मी उघडू पाहत होतो ते दार जोरानं माझ्याच अंगावर ढकललं ! त्या वार्यानं माझ्या हातातल्या कंदीलाची वात विझली आणि ती पडवी आणि ते घर अंधारानं गपकन गिळून टाकलं ! क्षणभर मी तसाच थबकून , हबकून , किंचितसा घाबरून गेलो . त्या तेव्हड्या वेळात माझ्या नजरेला अंधाराची ओळख झाली . बाहेरच्या झिमझिमत्या प्रकाशात दिसणारा परिसर मी चाचपू लागलो . मला एकाएकी जाणवलं ते गूढ अस्तित्व आणि उंचच उंच माडांच्या रांगातून वाट काढीत येणारा समुद्राचा आसमंत पछाडून टाकणारा आर्त स्वर -----------!