Avilability: In stock
भारत म्हणजे खेड्यांचा देश या लोकप्रिय समीकरणाच्या पलीकडे जाऊन आता भारतीय शहरांकडे सगळ्यांचे लक्ष वेधले जात आहे. आता आपल्यापुढे आव्हान आहे ते समकालीन भारतीय शहरी वास्तवातील गुंतागुंत समजून घेण्याचे. एकीकडे भारतीय शहरी वास्तव पाश्चात्त्य मानके, निर्देशांक आणि परिप्रेक्ष्यात न अडकता समजून घेणे हे एक आव्हान आहे. तर दुसरीकडे शहरविषयक संकल्पनांचीच पुनर्व्याख्या दक्षिण गोलार्धातील गरीब देशांच्या संदर्भात करण्याचेही. तिसरीकडे भारतातील शहरे एकाच आकाराची व प्रकारची नाहीत. त्यांच्या प्रमाणातील श्रेष्ठ-कनिष्ठता (स्केलर हायरार्की) हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. विविध प्रकारच्या शहरीपणाचे भौगोलिक, सामाजिक, आर्थिक आणि ऐतिहासिक आयाम समजून घेण्यासाठी नव्या प्रगल्भ समाजशास्त्रीय परिदृष्टीची गरज आहे. नव्या दृष्टीकोनातून शहरांचा अभ्यास करतांना पाश्चात्त्य पद्धतीचे नियोजन, नकाशे या पलीकडे जाऊन जिवंत व्यक्तींच्या कहाण्या समजून घेणे, विविध जाती वर्गातील व्यक्तींवर शहरातील वास्तव्याने काय परिणाम होतो ते पाहणे महत्त्वाचे ठरते. स्त्रिया, दलित, आदिवासी, कचरावेचक, वेश्या, पर्यायी लैंगिकता असणार्या अशा आजवर दुर्लक्षित असणार्याआ सर्व व्यक्तींच्या नजरेतूनही शहरी समाजाकडे पाहिले जावे ही अपेक्षा आहे. त्यातून शहरीजीवनाचे वेगळेच पैलू आपल्यासमोर येतील. ही नवी दृष्टी नव्या संशोधकांपर्यंत पोचवावी असा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे.