Avilability: In stock
श्री. रा. शं. नगरकर यांनी अतिशय परिश्रम घेऊन तुकारामांचे अनेक प्रकाशित गाथे मिळवले. जे गाथे मिळत नव्हते त्यासाठी प्रयत्नपूर्वक परिश्रम घेऊन त्यांनी ते प्राप्त करून घेतले आणि गेली अनेक वर्षे सातत्याने या गाथ्यांचा अभ्यास करून त्यांचा प्रमाणभूत आलेख या ग्रंथाद्वारे प्रसिद्ध केला आहे. या सर्व गाथ्यांचा अभ्यास करताना अभ्यासाचा दृष्टिकोन हा ठेवला की, त्या गाथ्यांचा, संकलनकारांचा इतिहास यांची यथासांग माहिती व्यवस्थित यावी. त्याकाळी या गाथ्यांवर काय प्रतिक्रिया दिल्या गेल्या याच्याही नोंदी दिल्या आहेत. या गाथ्यांची मांडणी करताना तौलनिक दृष्टी वापरून त्यांनी हा अभ्यास केला आहे. ही तुलना करताना पुढील मुद्दे विचारात घेतले आहेत- १) अभंग संख्या २) प्रक्षिप्त चिकित्सा ३) दुबार अभंग ४) तोडलेले अभंग ५) नामसादृश्यामुळे समाविष्ट झालेले अभंग ६) वेगवेगळ्या लोकांचे समाविष्ट झालेले अभंग ७) ओळीचे अभंग ८) वर्गीकृत अभंग इत्यादी. तुलनेसाठी त्यांनी कोष्टके तयार केली आहेत. त्यामुळे गाथ्यांचे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभे राहते. अपार परिश्रम करून या गाथ्यांचा अभ्यास श्री. नगरकरांनी या ग्रंथाद्वारे आपल्यासमोर प्रस्तुत केला आहे. या ग्रंथाची भाषा सरळ सोपी असली तरी आपले मुद्दे मात्र नगरकरांनी परखडपणे मांडले आहेत. ह्या वाटेला आत्तापर्यंत कोणी गेलेले नाही. हा अक्षुन्न अशा तर्हेचा या मार्गाने केलेला प्रवास आहे. ज्ञानपीठकार श्री. भालचंद्र नेमाडे यांनीही या लेखांची दखल घेतली आहे. डॉ. कल्याण काळे