Avilability: Out of stock
भारतात खासगी टीव्ही क्रांतीची सुरवात करणारा तो क्षण... तो दिवस होता 14 डिसेंबर 1991, ज्या दिवशी अशोक कुरियन आणि मी स्टार टीव्हीच्या हाँगकाँगमधील कार्यालयात पोहोचलो. दहा ते बारा वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी तिथे होते. स्टार टीव्हीचे प्रमुख रिचर्ड ली मात्र तिथे नव्हते, म्हणून आम्ही थोडा वेळ वाट पाहिली. एखादा राजा आशीर्वाद देण्यासाठी येतो आहे असे चित्र होते. अचानक रिचर्ड यांनी प्रवेश केला आणि माझ्या समोर बसले. ‘ओके, इंडियन चॅनेल, हिंदी चॅनेल,व्हेअर इज मनी इन इंडिया?’ रिचर्ड यांचा सूर नकारात्मक होता’. ‘मला जाँईंट व्हेंचर मध्ये स्वारस्य नाही.’ तिथे असलेल्या अधिका-यांसह सगळे जण थक्क झाले होते. हा प्रोजेक्ट कामाचा नाही असे मत रिचर्ड यांनी अगोदरच बनवले असावे असे दिसत होते. म्हणून मी रिचर्ड यांच्याशी थेट बोलणे सुरू केले. ‘मिस्टर ली, तुम्हाला जाँईंट व्हेंचरमध्ये रस नसेल तर तुम्ही (सॅटेलाईट) ट्रान्सपॉन्डर आम्हाला लीजवर देऊ शकाल का?’ ‘दरवर्षी 5 मिलियन डॉलरहून कमी दरात कुठलाही ट्रान्सपॉन्डर उपलब्ध नाही,’ रिचर्ड म्हणाले. त्यांच्या या उद्दाम उद्गारांनी मी दुखावला गेलो होते. ‘ठिक आहे, 5 मिलियन डॉलर देण्यास मी तयार आहे !’ हा एका झटक्यात घेतलेला निर्णय होता. मी जे म्हणालो त्याच्या परिणामांची मला जाणीव नव्हती.