Avilability: Out of stock
जे. आर. आर टॉल्कीनच्या दंतकथा साम्राज्यातली सर्वांत गाजलेली कादंबरी म्हणजे ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ अर्थात ‘स्वामी मुद्रिकांचा’! मध्य-वसुंधरेतील अनेकविध वंशांच्या सुखासमाधानाने चाललेल्या जीवनांत दुरात्मा, सर्वसत्ताकांक्षी सॉरॉन याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे दुःखाची काळी सावली येत चालली आहे. अगदी प्रदीर्घ काळापासून सर्व सुजन त्याच्याशी संघर्ष करीत आले आहेत. तो कधी जिंकला, कधी हरला; पण नष्ट मात्र झालेला नाही. त्याने सत्तेसाठी स्वतःचे बळ वाढवायला शक्तीमान अशा मुद्रिकांची निर्मिती करवून घेतली. या मुद्रिकांच्या शक्तीच्या प्रभावाने तो सार्या जगावर आपले अधिराज्य गाजवू शकतो. त्यातील एक मुद्रिका म्हणजे जणू त्याच्या ताकदीचा कणा आहे, पण नेमकी तीच मुद्रिका एका प्राचीन युद्धात त्याच्याकडून काढून घेण्यात आली होती. त्याचे वर्चस्व पुन्हा वाढत जात असताना त्याच्याकडे केवळ त्याच एका शक्तिमान मुद्रिकेची कमतरता आहे... शायर नावाच्या प्रांतातल्या एका सुस्त गावातील तरुण हॉबिट, फ्रोडो बॅगिन्स अचानक या सार्या नाट्यात ओढला जातो. ती शक्तिमान मुद्रिका त्याच्या हाती आली आहे. सॉरॉनला कायमचे नष्ट करण्यासाठी या मुद्रिकेचा तो वापर करणार की दुसरे काही? सुजनत्वावरील निष्ठेपोटी एक लहानसा जीव स्वतःचे घर व गाव सोडून मध्य-वसुंधरेच्या भूप्रदेशांमधून विपदांनी भरलेल्या वाटा धुंडाळत अंतःपर्वताच्या टोकावरील अग्निरसाच्या खाईपर्यंत जाण्यासाठी निघाला आहे. जगाच्या दुःखांवर मात करण्यासाठी स्वतःच्या गळ्यात दुःखाचे ओझे घेऊन तो चालणार आहे. त्याच्यासोबत आहेत त्याचे जिवाला जीव देणारे साथीदार... आणि विविध वंशांचे, विविध क्षमतांचे सुजन... त्याच्या विरुद्ध आहेत विविध वंशांचे दुर्जन... या लहानशा हॉबिटला हे आव्हान झेपेल का??? त्या संघर्षाची ही कहाणी... ‘स्वामी मुद्रिकांचा...’