Avilability: In stock
उराल पर्वतातील रशियन लोककथा. ‘मालाकाईट ’ नावाचा हिरवानिळा, मोरपिशी रंगाचा दगड रशियातल्या उराल परिसरातल्या तांब्याच्या समृद्ध खाणींमध्ये सापडतो. या खडकांतल्या रंगछटांमुळे हा दगड कोरीव वस्तू, विलासी वस्तू, अलंकार यांसाठी रशियात फारच प्रसिद्ध आहे. या परिसरात या खडकाच्या बरोबरच अनेक रत्नं, मौल्यवान धातूही सापडतात. या खाणींच्या परिसरातल्या जमीनदारांच्या, झारच्या गुलामीत काम करणारे खाणकामगार, त्यांची कुटुंबं आणि गावं यांचं एक वैशिष्ट्यपूर्ण समाजजीवन होतं. त्यांच्या कष्टपूर्ण जीवनात घडीभर विसावा देणार्या अनेक कहाण्या, लोककथा आहेत. ‘ताम्रपर्वताची राणी’ हे त्यातलं प्रमुख पात्र. सुंदर, मायावी, न्यायी असं हे काल्पनिक व्यक्तिमत्त्व या कथांतून एखाद्या कोपिष्ट देवीची भूमिका बजावतं. ‘पावेल बाज्झोव’ या लेखकाने या सर्व कहाण्या एकत्र करून लिहिल्या आणि त्यामुळे जगाला एका वेगळ्याच प्रकारच्या कल्पनारम्य कथांची देणगी मिळाली. यातल्या ‘मालाकाईटची मंजुषा’ आणि ‘पाषाणपुष्प’ या कथा तर रशियन कलाकारांनी नाट्यकृती, चित्रपट आणि रंगचित्रं अशा त्रिविध माध्यमांतून जिवंत केल्या आहेत. यातल्या अनेक कलाकृती इंटरनेटवर, यू ट्यूबवरही पाहायला मिळतात. उरालच्या या आगळ्या वेगळ्या आणि प्राचीन लोककथा लहानांबरोबरच मोठ्यांनाही आवडतील, इतक्या मनोरम आहेत.