Avilability: Out of stock
सामाजिक कार्य-प्रशिक्षक, तज्ज्ञ आणि विद्यार्थी यांची संबंधित विषयातील पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य यांची गरज लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांसाठी कौशल्य-प्रशिक्षण ही मार्गदर्शिका तयार करण्यात आली आहे. सामाजिक कार्यावरील सैद्धान्तिक पाठ्यपुस्तकांमध्ये सामाजिक कार्याच्या पद्धती वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांची यादी दिलेली असते, परंतु ही कौशल्ये विकसित कशी करता येतील, या विषयी मात्र संबंधित पुस्तकांमध्ये माहिती नसते. अशा, कार्यपद्धतींशी संलग्न असलेल्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी आवश्यक असे सराव-अभ्यास या मार्गदर्शिकेत दिले आहेत. त्यांच्याद्वारे ही उणीव भरून निज्ञेल. या मार्गदर्शिकेची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत - आकलन, स्व-जाणीव व संवेदनशीलता यांविषयी अंतर्दृष्टी येण्यासाठी या मार्गदर्शिकेमध्ये सैद्धान्तिक चर्चा, खेळ आणि सराव-अभ्यास यांचा समावेश करण्यात आला आहे. उदा. भूमिकानाट्ये, गाणी, व्यष्टि- अध्ययने, पथनाट्ये, इ. तसेच स्व-जाणीव, स्व-विकास, स्वॉट ऍनालिसिस, संवाद, ध्येयनिर्मिती, वेळेचे व्यवस्थापन, तणावाचे व्यवस्थापन यांवरील सराव-अभ्यास आहेत. विद्यार्थ्यांचे क्षेत्रीय अनुभव आणि सामाजिक संस्थांच्या कार्याचे नोंदी- अहवाल या दोन्हींचा उपयोग करून समाजकार्याच्या पद्धती आणि स्थानिक वस्तुस्थिती यांची लवचीक सांगड कशी घालता येईल, हे या मार्गदर्शिकेत स्पष्ट करण्यात आले आहे. परस्परांच्या आधारे काम करण्याची क्षमता व्यक्तीमध्ये कशी विकसित करता येईल, प्रशिक्षणार्थींचा सर्वांगीण व्यावसायिक विकास कसाघडवून आणता येईल ह्याबाबतही या मार्गदर्शिकेत सतत विचार करण्यात आला आहे. या वैशिष्ट्यांद्वारे विद्यार्थी व अभ्यासकांना आपली मूल्ये आणि क्षमतांविषयी सखोल जाणीव होईल आणि वेगवेगळ्या गटांबरोबर वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करताना करायच्या मध्यस्थीसाठीची कौशल्ये त्यांच्यात येतील. सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये अत्यावश्यक अशा जागतिक दर्जाच्या व्यावसायिक क्षमता रुजविण्यासाठी या पुस्तकाचा नक्की उपयोग होईल. इतर क्षेत्रांतील प्रशिक्षकांनादेखील लोकांबरोबर काम करण्यासाठी लागणारी कौशल्ये आपल्या प्रशिक्षणार्थींमध्ये विकसित करण्यासाठी या मार्गदर्शिकेचा वापर करता येईल.