Avilability: In stock
स्टीव्ह जॉब्झच्या संपूर्ण सहकार्यानं लिहिलेलं अधिकृत चरित्र. स्टीव्ह जॉब्झचं वॉल्टर आयझॅक्सननी लिहिलेलं अधिकृत चरित्र. दोन वर्षाच्या कालावधीत घेतलेल्या स्टीव्ह जॉब्झच्या चाळीसहून अधिक मुलाखतींवर आधारित. - त्याचबरोबर शंभरहून अधिक कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी, सल्लागार, प्रतिस्पर्धक आणि सहकारी यांच्याही मुलाखती - असं हे पुस्तक एका उन्मेषपूर्ण व्यावसायिकाच्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाच्या जीवनाचा प्रचंड वेगाने वर-खाली होत असलेला ‘रोलरकोस्टर’ आलेख सांगते, ज्याच्या पूर्णत्वाच्या उत्कटतेने आणि महत्त्वाकांक्षेने सहा उद्योगांमध्ये क्रांती आणली : पर्सनल कम्प्यूटर्स, अॅनिमेटेड चित्रपट, संगीत, फोन, टॅब्लेट कम्प्यूटर्स आणि डिजिटल प्रकाशन व्यवसाय. २१ व्या शतकात कल्पकता आणि तंत्रज्ञानाचा मेळ घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे, किंबहुना ती काळाची गरज आहे, हे त्यानं ओळखलं आणि म्हणूनच कल्पकतेची भरारी आणि तंत्रज्ञानाची विलक्षण शक्ती यांचा मिलाफ असलेली ‘अॅपल’ नामक कंपनी उभी करून जॉब्झ जणू सृजनशील आणि व्यावहारिक कल्पकतेचं मूर्तिमंत उदाहरणच ठरला. स्टीव्ह जॉब्झनी जरी या पुस्तकासाठी सहकार्य केलं असलं तरी त्यानी त्यातील लिखाणावर कुठल्याही प्रकारे बंधन घातलं नाही. ‘‘ज्यांचा अभिमान वाटू नये अशा कित्येक गोष्टी मी केल्या आहेत. परंतु माझ्या कपाटात दडवून ठेवलेलं असं काहीही नाहीये, जे बाहेर येऊ नये म्हणून मी प्रयत्न करावा,’’ तो सांगतो. जॉब्झ त्याच्या सहकाऱ्यांबद्दल, प्रतिस्पर्ध्यांबद्दल मनमोकळेपणाने आणि कधीकधी अगदीच स्पष्टपणे बोलतो. त्याप्रमाणेच त्याचे मित्र, शत्रू आणि सहकारीसुद्धा त्याचा झपाटलेपणा, त्याचे दोष, परिपूर्णतेचा ध्यास, त्याच्या इच्छा-आकांक्षा, कला, मोहकता आणि त्याचा नियंत्रणाचा हट्ट, ज्यानी त्याच्या व्यवसायाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाला आकार दिला आणि ज्यातून नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट्सची निर्मिती झाली... यांवर आपली प्रांजळ मतं व्यक्त करतात. ज्याप्रमाणे ‘अॅपल’ची हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एका एकसंध यंत्रणेचा अविभाज्य भाग म्हणून जोडलेले असतात, त्याप्रमाणेच जॉब्झचं व्यक्तिमत्त्व, त्याची उत्कट जिद्द आणि त्यानी निर्माण केलेली प्रॉडक्ट्स हीसुद्धा एका अन्योन्य संबंधानी जोडलेली असतात. त्यामुळेच त्याचं आयुष्य म्हणजे कल्पकतेच्या, जिद्दीच्या, नेतृत्वाच्या आणि नीतिमूल्यांच्या धड्यांनी भरलेली उद्बोधक आणि सूचनात्मक कहाणी आहे.