Avilability: In stock
चार्वाकबुद्धांपासून सुरू झालेल्या मूर्तिभंजनाच्या वैचारिक परंपरेला बळ देणारी महात्मा जोतीराव फुले यांची सामाजिक क्रांतीची बीजे पेरणारी मूर्तिभंजनात्मक मराठी कविता आधुनिक काव्याची पायाभरणी करणारी ठरली. त्यांनी ‘निर्मिक’ ही नवी संकल्पना निर्माण करून तथाकथित ‘ईश्वरा’ला फाटा दिला आणि मूर्तिभंजनाच्या नव्या प्रेरक विचाराची परंपरा सुरू केली. युगप्रवर्तक कवी केशवसुतांनी ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनी’ म्हणत, आपल्या कवितेतून मूर्तिभंजनाची ‘तुतारी’ फुंकून, नव्या दमाच्या शूर शिपायाची ओळख करून दिली. केशवसुतांचा सामाजिक विचार स्वीकारून रे. टिळकांनी ख्रिस्ती धर्माला जवळ केले. केशवसुतांचा सच्चा चेला म्हणविणार्या गोविंदाग्रजांनी आपल्या प्रकृतीनुसार मूर्तिभंजनाच्या कार्याचा विस्तार केला. कवी कुसुमाग्रजांच्या दाहक कवितेने मूर्तिभंजनाचे उन्नत स्वरूप दाखविले, तर मर्ढेकरांनी मानवी जीवनाच्या भीषण वास्तवाचे नवे दर्शन घडविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या प्रेरकतेतून निर्माण झालेली दलित कविता ही मुळातच परिवर्तनवादी. विद्रोहाचे पाणी पेटवून भडका उडविण्याचे सामर्थ्य सर्वच कवींच्या काव्यातून दृग्गोचर कसे होते, हे सर्व - संदर्भपुष्ट ‘मराठी कवितेतील मूर्तिभंजन’ मराठी वैचारिक वाङ्मयात मोलाची भर टाकते.